......म्हणून राज ठाकरे वेगळे ठरतात..........

 


राज ठाकरे हे नाव कोणत्याही मराठी माणसाला आणि मराठी द्वेष्टे उत्तर भारतीयांना अपरिचित नाही. त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली,आणि २०१३ ला नरेंद्र मोदी याना पंतप्रधान उमेदवारीसाठी सर्वात प्रथम पाठींबा दिला आणि तिथून त्यांच्या राजकीय अस्थैर्याला सुरुवात झाली.पहिल्याच प्रयत्नात २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दणदणीत १३ आमदार निवडून आल्यानंतर मनसेची आजची राजकीय स्थिती एका आमदारावर स्थिरावली आहे. त्यांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले.तरीही एकमात्र निश्चित त्यांच्या लोकप्रियतेत आणि राजकीय वजनात अजिबात घट झालेली नाही.हा करिष्मा फारच कमी लोकांना जमतो,राज ठाकरे त्यापैकी एक अग्रणी नाव. ह्या देशात लाखोंच्या सभा,त्याही ओढूनतानुन आमिष दाखवून लोकांना न जमवता घडविण्याचा विक्रम खरतर राज ठाकरेंच्या नावावरच जमा व्हायला हवा.ह्यामागे त्यांची जबरदस्त वक्तृत्व शैली कारणीभूत आहे.श्रोत्यांची नस पकडण्यात राज ठाकरेंच्या जवळपासही कोणी फिरकू शकत नाही इतकी अमोघ वक्तृत्व शैली लाभलेला नेता विरळाच....समाजमनाला विशेषतः मराठी तरुणाईला आत्मभान देणारा बाळासाहेबांनंतरचा दुसरा तितकाच प्रभावशाली नेता म्हणून कायमच त्यांच्याकडे पाहिले गेले.

चुकलं कुठे?

नरेंद्र मोदींच्या उदयाच्या आधी  राज ठाकरेंची जनमानसावर जबरदस्त पकड होती. परंतु मोदींच्या सद्भावना उपोषणाला उपस्थित राहून त्यांनी थेट मोदी पंतप्रधान व्हावेत ही भूमिका मांडली आणि दुर्दैवाने त्यांच्या राजकीय विसंगत भूमिकांना सुरुवात झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदींना पाठींबा देण्यासाठी  युतीच्या उमेदवारांविरोधात विशेषतः सर्वच शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभे केले आणि त्यातून त्यांची राजकीय विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात सापडली.नंतरच्या काळात मोदींच्या चुकांवर सर्वाधिक टीकाही त्यांनीच केली. मोदींच्या धोरणांवर सर्वाधिक जहाल भाषेत टीका राज ठाकरेइतकी कोणीही केली नसेल,अगदी कॉंग्रेसनेही नाही.त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत "लाव रे तो व्हिडीओ" म्हणत केलेलं वस्त्रहरण हा राजकीय निरीक्षकांसाठी मोठा अभ्यासाचा विषय होता. EVM  विरोधातही त्यांनी मोठे आंदोलन उभे केले त्यासाठी त्यांनी अगदी आजवर जहरी टीका केलेल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनाही एकत्र केले आणि त्यानंतर प्रथेप्रमाणे त्यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस आली आणि त्यानंतर .......... असो ....तो सर्व इतिहास आहे.

राज ठाकरे वेगळे का ठरतात ......

मुद्दा  साधा सरळ आहे,असंख्य नेत्यांच्या भाऊगर्दीत राज ठाकरे वेगळे का ठरतात? ह्यामागे त्यांच्यातला कलाकार कारणीभूत आहे. राज साहेबांच्या सभा असो कि सभेचे,पक्षाचे फलक सौंदर्यशास्त्र नावाचा प्रकार जोपासण्यात कुठेच कसर राहणार नाही याची दक्षता राज साहेबांमधला कलाकार कटाक्षाने घेतो.एखाद्या नेत्याने स्वतःला प्रेझेंटेबल कसे ठेवावे याचे वस्तुपाठ इतरांनी राज ठाकरेंकडून घ्यायला पाहिजे. प्रसार माध्यमे आणि सोशल मिडिया यांचा प्रभावी वापर ह्या देशात सर्वात परिणामकारकपणे करण्यात राज ठाकरेंचा हात कोणीही धरू शकत नाही.अर्थात यामागे त्यांचा आणि त्यांच्या टीमचा जबरदस्त अभ्यास आणि संशोधन नक्कीच आहे.जात्याच व्यंगचित्रकार असल्याने त्यांना इतरांमधील दोष लगेच दिसतात आणि ते आपल्यात येणार नाही ह्याबद्दल ते कमालीचे दक्ष असतात म्हणून ते राजकीय यश मिळत नसलं तरीही मास लीडर ठरतात. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास,अचूक निरीक्षण आणि त्यानुरूप प्रभावी शब्द निवड ही वैशिष्ट्ये केवळ राज ठाकरेंनाच दैवी वरदानाने लाभले असे म्हणायला  नक्कीच वाव आहे.त्यामुळेच राज ठाकरे कायमच अडोरेबल वाटत राहतात,अर्थात ह्याचा त्यांना मतपेटीतून फायदा होत नाही हा भाग वेगळा.

चांगल्या प्रयत्नांना अपयश का? 

वेगळा राजकीय पर्याय आणि नवी राजकीय दृष्टी देऊनही राज ठाकरे कागदावरील गणितात कमी का पडतात,याचे विश्लेषण अनेक अंगांनी करता येईल.मुळातच महाराष्ट्र हे प्रचंड मोठ आणि भयंकर वैविध्य असलेले राज्य आहे.इथल्या प्रत्येक विभागाच्या समस्या वेगळ्या आहेत,आणि जगण्यामरण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खटपटी हि वेगळ्या स्वरूपाच्या आहेत,त्यामुळे लोकल ट्रेनच्या गर्दीत घुसमटनाऱ्या मराठी माणसाला जो मुद्दा भिडेल तो गाव खेड्यावर अंधारात खितपत पडलेल्या माणसाला पटेलच हे म्हणणे धाडसाचे होईल.शिवाय जात-पात,विभागाचे निकषही निकालावर दूरगामी परिणाम करतात.निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करणे आणि त्यांना कार्यक्रम देऊन पक्षाशी एकनिष्ठ ठेवणे हि तितकीच कर्मकठीण गोष्ट.सत्ता असली तरच कार्यकर्ते,समर्थक यांना कंत्राटे,महामंडळे देऊन शांत करता येते अन्यथा लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यात कुणालाही रस असत नाही.अर्थात हे मुद्दे थोड्याफार फरकाने सर्वच पक्षांना लागू होतात.राजकीय विचारसरणीवर जीवापाड प्रेम करून एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा जमाना कधीच संपला,आता फक्त व्यवहार उरलाय.आपली आणि आपल्या सग्यासोयर्यांची सोय हाच राजकारणाचा मूलमंत्र झाल्यावर सत्ता हीच संजीवनी ठरली,बाकी सगळे मुद्दे निरर्थक. राजकीय कोलांटउड्या मागच्या काही काळात जेवढ्या देशात आणि राज्यात आपण पाहिल्या हे त्याचेच द्योतक म्हणता येईल.आता खऱ्या अर्थाने निष्ठावंत जमाती दोनच शिल्लक आहेत,एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि दुसरे संघाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या चळवळीचे कार्यकर्ते.बाकी सगळा मतलबी कारभार.अशा स्थितीत पक्ष एकसंध ठेवणे ही अत्यंत दुष्कर गोष्ट कोणालाही अवघडच ठरली असती,त्याला कोणीही अपवाद नाही.

.........तरीही राज ठाकरे आवश्यकच ठरतात....

राज ठाकरेच्या महाराष्ट्र विकास आराखड्याची अर्थात ब्लू प्रिंट ची दखल आजवर कोणीच घेतली नाही.तो एक जबरदस्त व्हिजन डॉक्युमेंट आहे,पण दुर्दैवाने त्यावर फारशी चर्चा झाली नाही. पण एक मात्र खरे इतका सूक्ष्म आणि सखोल अभ्यास करणाऱ्या राजकीय व्यक्तिमत्वाला अदखलपात्र करणे महाराष्ट्र हिताचे नाही. राज ठाकरेंनी आपल्या व्हिजन डॉक्युमेंटच्या माध्यमातून मांडलेले विचार त्यांच्या दूरदृष्टीचे आणि विकासासाठी पोटतिडकीच्या नियतीचे प्रमाण ठरते. आपण त्यांचे व्हिजन समजून घेण्यात कमी पडत तर नाही ना याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा.असो राजकीयदृष्ट्या नसेल कदाचित पण लोकप्रियता आणि लोकसंग्रह ह्या बाबतीत कायमच आघाडीवर असलेल्या ह्या मऱ्हाटी नेत्याला ५३ व्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा  देऊन सांगता करूया....

जय महाराष्ट्र ....!!!



Comments

Popular Posts