संजय सिंग खरोखरच उत्तर प्रदेशमध्ये चमत्कार घडवतील का?
अण्णा आंदोलनातून उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षातील म्हणजे आम आदमी पार्टी पक्षातील ज्या काही राजकारणी मंडळींनी लक्षवेधी कामगिरी केली त्यामध्ये राज्यसभा खासदार संजय सिंग यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.दिल्लीमधील सरकारचा चेहरा प्रामुख्याने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या दोन नावांभोवती फिरत असला तरीही उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या तितक्याच संवेदनशील असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या आणि आता राज्यसभेचे खासदार असणाऱ्या संजय सिंग यांचे प्रस्थही अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते.
बेछूट आरोप करून अमाप प्रसिद्धी मिळवायची सवय लागलेल्या राजकारणी मंडळींमध्ये अभ्यासपूर्ण आणि तितक्याच प्रभावीपणे बोलणाऱ्या मंडळींमध्ये संजय सिंग यांचा समावेश होतो. त्यांनी अलीकडच्या काळात अनेक पत्रकार परिषदा घेऊन योगी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आणि त्यात सर्वात लक्षणीय ठरला तो त्यांनी उजेडात आणलेला राम मंदिर जमीन खरेदी घोटाळा. फक्त पाच मिनिटात जमिनीची किंमत करोडो रुपयांनी वाढली हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आणि खळबळ उडवून दिली.इंधन दरवाढीतून मोदी सरकारने २३ लाख कोटींची लुट सात वर्षात केली हाही आरोप त्यांचाच...महामारीच्या काळात योगी सरकारने वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत केलेला भ्रष्टाचार पण त्यांनी पुराव्यासह उजेडात आणला.एकंदरीत प्रभावी विरोधी पक्षाची जी भूमिका कॉंग्रेस बजावू शकली नाही ती प्रखरपणे संजय सिंग सारखी मंडळी बजावतात हे नक्कीच कौतुकास्पद आहे.कॉंग्रेसला प्रदीर्घकाळ सत्तेत असल्याने आणि विचारलेल्या प्रश्नांचा रोख बऱ्याच प्रमाणात त्यांच्यावरही उलटण्याची शक्यता असल्याने विरोधी पक्षाची भूमिका बजावताना अनेक मर्यादा पडतात,परंतु ती मर्यादा कोरी पाटी असलेल्या पक्षांना भेडसावत नाही आणि त्याचा ते पुरेपूर वापर करून घेतात ही अत्यंत चांगली बाब आहे. असो तर हे संजय सिंग नावाचे गृहस्थ पहिल्यांदा प्रकाशात आले ते त्यांच्या खासदारकीच्या पदाच्या निवडीवरून... राज्यसभेवर आम आदमी पक्षासाठी प्रमाणात केवळ एकच जागा उपलब्ध होती आणि त्यासाठी महाकवी कुमार विश्वास गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते पण पक्षांतर्गत विरोध आणि एकंदरीत कुमार विश्वास यांचा उथळपणा नडला आणि पक्षाने पूर्ण विचारानिशी संजय सिंग यांची निवड केली.खरतर यामुळे दुखावलेला कुमार विश्वास'शर्मा'पक्षापासून कायमचा दुरावला आणि त्याने मिळेल त्या व्यासपीठावरून केजरीवाल आणि कंपनीवर यथेच्छ टीका करायला सुरुवात केली.दुसरीकडे अतिशय शांतपणे आणि तितक्याच अभ्यासपूर्वक पद्धतीने संजय सिंग यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.निव्वळ हवाबाजी आणि आठवले साहेबांसारख्या कविता न करता राज्यसभेत अत्यंत अभ्यासपूर्ण आणि त्वेषपूर्ण भाषणांनी त्यांनी संसद गाजवली.सरकारला कोंडीत पकडण्याचा एकही मुद्दा त्यांनी सोडला नाही.परिणामस्वरूप जेव्हा उत्तर प्रदेशच्या निवडणुका तोंडावर आल्या तेव्हा पक्षाने पूर्ण प्रदेशाची धुरा एकहाती त्यांच्यावर सोपवली.काहीजणांना हा केजरीवाल ह्यांनी स्वतःचे पक्षातील विरोधक अडगळीत टाकायला घेतल्याचा प्रकार वाटला,परंतु संजय सिंग यांनी ज्यापद्धतीने उत्तर प्रदेशात नामशेष झालेल्या विरोधी पक्षाला नवचैतन्य मिळवून दिले त्यावरून हा 'मास्टरस्ट्रोक'समजायला हरकत नाही.
आता नेमकी अडचण काय आहे?
आम आदमी पार्टी अतिशय नवखी असल्याने लगेच सत्तेत येण्याची शक्यता अजिबातच नाही.परंतु पक्ष उत्तर प्रदेशसारख्या महत्वपूर्ण राज्यात राजकीय चंचुप्रवेश करू शकतो हे निश्चित.त्यातच दिल्लीप्रमाणे त्यानी उत्तर प्रदेशमध्येही मोफत वीज देण्याचे आश्वासन दिलंय ते केवळ हास्यास्पद आणि अतार्किक आहे.दिल्ली आणि उत्तर प्रदेश ह्या दोन भिन्न बाबी आहेत.उत्तर प्रदेशसारख्या बिमारू आणि फारसे नागरीकरण आणि औद्योगिकरण न झालेल्या राज्यात मोफत गोष्टी देणे म्हणजे दिवाळखोरीला आमंत्रण ठरेल.कोणताही सुज्ञ पक्ष त्या फंदात पडणार नाही.परंतु आम आदमी पक्षाची ती आता खासियत बनत चालली आहे.अरविंद केजरीवाल ह्यांनीही गोव्यात सर्वधर्मियांना तीर्थक्षेत्राची मोफत सफर घडवण्याचे आश्वासन दिले,ते राजकीय बावळटपणाचे उत्तम उदाहरण होते.एकवेळ वीज,पाणी,शिक्षण ह्या बाबी मोफत करणे किंवा माफक दरात उपलब्ध करून देणे समजण्यासारखे आहे मात्र तीर्थक्षेत्रांची यात्रा हा काही लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न नक्कीच नाही.तरीही संजय सिंग यांनी उत्तर प्रदेशात आशा पल्लवित केल्या आहेत.त्यांनी अलीकडेच समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा अखिलेश यादव यांची भेट घेऊन संभाव्य युतीची पायाभरणी केली आहे.ही युती झाल्यास त्यांना काही जागा सुटणे सहज शक्य आहे,आणि तितकासा प्रबळ कार्यकर्ता बेस उत्तर प्रदेशात नसल्याने आम आदमी पक्ष जितक्याही जागा उत्तर प्रदेशात जिंकेल तो त्यांच्यासाठी नक्कीच बोनस असेल.


Comments
Post a Comment