आणि भूत बाटलीतून बाहेर आले....
नरेंद्र मोदींचा भारतातील उदय हा कॉंग्रेसच्या नाकर्तेपणामुळे झाला हा सर्वात मोठा गैरसमज बाळगणाऱ्या लोकांना अण्णा आंदोलन नेमकं कशासाठी होतं हे आजपर्यंत समजलेले नाही.भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शन ह्या अरविंद केज्रीवालांच्या संस्थेने जनलोकपाल नावाचा भंपक लढा उभा केला आणि त्यासाठी आधुनिक गांधी अण्णा हजारे यांना दावणीला बांधून देशात जे आंदोलन उभे केले त्याला अजिबातच तोड नव्हती.एकतर त्या आंदोलनात सहभागी झालेले तरुण राजकारण कशाशी खातात याची अजिबात समज नसणारे होते,पूर्णपणे कोरी पाटी असणाऱ्या तरुणांना भुरळ घालून विकृत बनविण्यात टीम अण्णा कमालीची यशस्वी झाली.त्यातच त्याकाळात फेसबुक भारतात बाळसे धरत होते.तरुणांना फेसबुकच प्रचंड आकर्षण होते.ह्या माध्यमाचा सर्वात प्रभावी वापर केला तो टीम अण्णा आणि त्याचा म्होरक्या असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी. फेसबुकसारख्या माध्यमाचा उपयोग करून जनमत आपल्या बाजूने करता येते याचा सर्वात मोठा वस्तुपाठ अण्णा आंदोलनाने देशाला दिला.अर्थात ह्या माध्यमातून कॉंग्रेसची यथेच्छ बदनामी करण्यात आली.वेगवेगळ्या मेम्सच्या माध्यमातून कॉंग्रेसचे जे चारित्र्यहनन झाले त्याची भरपाई आजपर्यंत होऊ शकलेली नाही.हीच पुढच्या मतदारांची पिढी होती ज्यांना बदल हवा होता,पण वास्तव काय आहे ह्याचे पुरेसे राजकीय आकलन त्यांना तेव्हाही नव्हते आणि आजही नाही.अंधभक्त नावाचा प्रकार जन्माला आला तो या आंदोलनातच.....
अण्णा आंदोलनाला पाठींबा देणारे तरुण काहीसे भरकटलेले होते हे जरी मान्य केले तरी आंदोलनाची धग पेटवणारे मात्र आपल्या ध्येयाच्या बाबतीत प्रचंड निश्चिंत आणि आश्वासक होते.आपल्याला ह्या आंदोलनातून नेमकं काय साध्य करायचं आहे ह्याचं आकलन यामध्ये सामील झालेल्या प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणात होते.भाजप आणि संघाचा याला खुला आणि छुपा पाठींबा होता.खुला यासाठी कि काही भाजप नेते यामध्ये खुलेआम सहभागी झाले आणि छुपा यासाठी कि ह्या आंदोलनाच्या संयोजनात आपला काडीमात्र सहभाग नसल्याचे ते सातत्याने नोंदवत राहिले,हे आंदोलन उत्स्फूर्त आहे आणि तरुणाई कॉंग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली आहे हाच त्यांचा एकंदरीत सूर होता.त्यातून झाला तर फायदा उचलायचा अन्यथा आंदोलन फसले तर त्याची जबाबदारी टीम अण्णा वर ढकलायची रणनीती होतीच.
पण त्या सर्वांमध्ये उत्साही सहभाग होता तो सुषमा स्वराज यांचा...त्यांना त्या आंदोलनातच पंतप्रधान पदाचे डोहाळे लागले होते आणि भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने त्यांना जाहीर समर्थनही दिले होते पण माशी शिंकावी त्याप्रमाणे एक मोठी चूक त्यांच्याकडून घडली.त्या आंदोलनासाठी उभारलेल्या स्टेजवर नाचल्यामुळे त्यांची त्याकाळात जी नाचक्की झाली ती त्यांची प्रतिमा मलीन करून गेली.अर्थात त्यांचे पक्षांतर्गत विरोधक त्यातून सुखावले नसतील तर नवलच....पण एक अभ्यासू भावी महिला पंतप्रधान त्याच आंदोलनात मृत पावली एवढे मात्र निश्चित....
कॉंग्रेसने प्रथेप्रमाणे या आंदोलनाची सुरवातीला अजिबात दखल घेतली नाही.मनीष तिवारी सारखे त्यांचे प्रवक्ते या आंदोलनाची सुरवातीला खिल्ली उडवत राहिले.समाज माध्यमांची ताकद काय असते याची जाणीव कॉंग्रेसला तेव्हाही नव्हती आणि एवढ पानिपत होऊन आजही नाही.समाज माध्यमे आणि कलाकार यांचा वाढता पाठींबा बघता अण्णा आंदोलन चिघळत गेले.संसदेच्या अधिवेशनात त्याच्यावर खमंग चर्चा झडत गेल्या आणि शेवटी कॉंग्रेसला तत्कालीन केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून अण्णा हजारे यांची समजूत काढून आंदोलन शांत करावे लागले.विलासराव देशमुखांची मुत्सद्देगिरी कामाला आली आणि आश्वासनावर बोळवून करून आंदोलन काही काळ स्थगित झाले.मुळातच जनलोकपाल हि संकल्पनाच भारतीय राजकारणासाठी अनाकलनीय आणि अप्रस्तुत होती.युरोपातल्या चिमुकल्या देशात प्रभावी वाटणारी हि बाब भारतासारख्या खंडप्राय देशात कुचकामी ठरते.याचे एक सरळ उदाहरण म्हणून बँक लोकपाल म्हणून बघता येईल.बँक व्यवस्थेतही लोकपाल नावाचा प्रकार असतो हे किती भारतीयांना माहित असेल याची कल्पना नाही पण तो लोकपाल ही बँकेतले गैरप्रकार रोखू शकलेला नाही हि बाब अलाहिदा...
पण ह्या सगळ्या रणधुमाळीत एक व्यक्ती मात्र ठामपणे जनलोकपाल नावाच्या व्यवस्थेचा ठामपणे विरोध करत होती आणि ती व्यक्ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.....अमेरिकेच्या पैशांवर आंदोलन उभे करून देशाची व्यवस्था खिळखिळी करण्याला त्यांचा ठाम विरोध होता....अर्थात हे वास्तव देशातल्या सर्व राजकीय नेत्यांना कळत होतं पण मतांच्या राजकारणात कुणीही ते बोलण्यास तयार नव्हत....
अर्थात पुढे आंदोलन फसलं ...जनलोकपाल नावाचं कोणतही पद देशात निर्माण झालं नाही,देशातला भ्रष्टाचारही संपला नाही,हो पण भ्रष्टाचाराचे मार्ग आणि माध्यम बदलले...सामान्य माणसाच्या आयुष्यात कवडीचाही फरक पडला नाही.टीम अण्णा आणि अण्णा हजारे यांच्यातही राजकीय प्रवेशावरून मतभेद निर्माण झाले.शेवटी अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांच्या प्रमाणे आडमुठी भूमिका न घेता शहाणपण दाखवले,आणि स्वतःचा राजकीय पक्ष "आम आदमी पार्टी" स्थापन केला.अण्णा हजारे यांची ताठर भूमिका कधीही कोणत्या आश्वासक निर्णयापर्यंत येऊ शकत नाही ह्याची जाणीव त्याना फार लवकर झाली आणि त्यांनी अण्णा हजारे नावाच्या जोखडातून स्वत:ची सुटका करून घेतली.तेव्हापासून अण्णा हजारे एकाकी पडलेत ते आजतागायत ...आपली फसवणूक झाली आणि आपला वापर केला याची बोच त्यांना कायमच राहील.....पण ते कायमच मौनात राहत असल्याने ते हे कधीच कबुल करणार नाहीत....
ह्या सगळ्या वगनाट्याकडे गुजरातमधून नरेंद्र मोदी शांतपणे पाहत होते.संधीचं सोन करायची त्यांची कुवत देशातल्या कोणत्याच तत्कालीन राजकारण्याकडे नव्हती.त्यातच नरेंद्र मोदी हे कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यात माहीर होते.इव्हेंट management आणि इमेज मेकिंग करण्यात तरबेज असलेल्या मोदींनी अण्णा हजारेंनी अर्धवट सोडलेल्या वगनाट्याचे पुढील दिग्दर्शन करण्याचा धोरणी निर्णय घेतला....त्यांचे नशीब म्हणा कि आणखी काही फेसबुकच्या जोडीला whatsapp नावाचे नवे हत्यार मोदींना खुले झाले आणि देशातील तंत्रस्नेही लोकांचा अतिशय चपखल आणि परिणामकारक वापर मोदींनी करून घेतला.whatsapp विद्यापीठातून मोदींच्या विजयाचा प्रचार जोरात सुरु झाला.
त्यामध्ये रामदेव बाबांसारखे सलवार कुर्ता घालायची नामुष्की ओढावलेले दुखी आत्मे सहभागी झाले,त्यांनी तर सरळसरळ ३५ रु लिटरने पेट्रोल देण्याची घोषणा करून टाकली. काळेधन भारतात आल्यावर भारताचा कायापालट कसा होईल याचे अर्थशास्त्रीय विश्लेषण रामदेव बाबांनी फारच मार्मिकपणे केले,जे आजही जगभरातल्या अर्थतज्ञांना मार्गदर्शक ठरत.
आणि शेवटी व्हायचे तेच झाले...भूत बाटलीतून बाहेर आले.
अण्णा आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे उखळ पांढरे झाले.
अरविंद केजरीवाल तीन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले,त्यांच्या पक्षाचा प्रभाव दिल्लीसोबत नजीकच्या पंजाब,हरियाना,उत्तर प्रदेश राज्यात निर्माण झाला.
सुषमा स्वराज ,अरुण जेटली जनरल व्ही के सिंग मोदी सरकारमध्ये मंत्री झाले.
किरण बेदी राज्यपाल झाल्या.
कुमार विश्वासची कविता गायनाची बिदागी काही हजारातून लाखात गेली.
रामदेव बाबाची व्यवसायाची उलाढाल अरबो रुपयांनी वाढली .
मोदी पंतप्रधान झाले आणि मोदीच्या वावटळीत हरलेले कॉंग्रेस नेते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते भाजपमध्ये जाऊन पावन झाले.
अण्णा हजारे सोडून सर्वजण सुखी झाले...
पण प्रश्न हा उरतो की त्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना काय मिळालं ....त्यांना मिळालं बाटलीतून बाहेर पडलेले भूत...ज्या भुताने ती बाटलीच झाकणासकट समुद्रात फेकून दिलीय...
एक उद्धवस्त राजकीय व्यवस्था दिली ज्यामध्ये प्रश विचारणे देशद्रोह ठरू लागला.. नेत्याविरुद्ध बोलणे धर्मविरोध ठरू लागला....
बेरोजगारी,महागाई आणि तार्किक बाबी याविषयी काहीही बोलणे हि घोडचूक ठरू लागली..
असो आता याचा शेवट काय होईल याची कल्पना कोणालाच नाही....
कारण द्वेषाच भूत बाहेर पडलंय...त्याला परत बाटलीत टाकून झाकण लावायची हिम्मत कोणातच नाही...
काळजी घ्या ...






Comments
Post a Comment