महाराणी - बिहारच्या राजकारणाचा वास्तव चेहरा

 Bihar is not just a state .... It is a state of mind....

"हम बिहार को स्वर्ग नही बना पाये तो क्या हुआ,हमने बिहार के दबले कुचलो को स्वर तो दिया "



सुभाष कपूर निर्मित सोनी लिव वरील "महाराणी " वेब सिरीज बिहारमधील राजकीय संघर्षाचा नितांत सुंदर वेध घेण्यात कमालीची यशस्वी झालीय. आतापर्यंत रिलीज झालेल्या वेब सिरीजमधील बहुदा हि सर्वाधिक लांबीची म्हणजे तब्बल साडेसात तासांची आणि दहा भागांची मालिका असलेली वेबसिरीज कधीच रटाळ वाटत नाही.सुभाष कपूरच्या टीमने ह्या दहा भागात बिहारमधील राजकीय संघर्ष,जातीय तणाव,स्त्रियांची एकंदरीत समाजजीवनातील परिस्थिती,भ्रष्टाचाराचे उदात्तीकरण यासारख्या अनेकविध घटकांवर प्रभावी भाष्य केलेय,आणि हे सर्व करताना कथेचा वेग आणि उत्कंठा कायम ठेवण्यात ते कमालीचे यशस्वी झालेत.

महाराष्ट्राला राजकीयपटाची वानवा नाही,सरकारनामा,सिंहासन हे प्रभावी राजकीय थरारपट आपण अनुभवले आहेत,कदाचित २०१९ च्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात घडलेले राजकीय थरारनाट्य कुठल्याही चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नव्हते.पण काहीही म्हणा बिहारच्या राजकारणाचा बाज काही औरच आहे.बिहारच्या राजकारणातील थरारनाट्य पाहण्यात जि मजा आहे ती क्वचितच इतर राज्यांच्या राजकारणाबाबत लागू पडत असेल.आणि त्यातच महाराणी सारखे थरारनाट्य अनुभवायला मिळत असेल तर त्या अनुभवाची  उंची एकदमच शिखर गाठते.

कसलेला अभिनय,जबरदस्त पटकथा,लॉकडाऊनच्या काळातही उच्च दर्जा राखून असलेली निर्मिती मुल्ये ही महाराणीची अत्यंत जमेची बाजू.लॉकडाऊनच्या काळात चित्रपटाची काय भयानक अवस्था होते याचं अलीकडच उदाहरण म्हणजे राधे चित्रपट. ह्या चित्रपटात सर्वच कलाकाराना बघणे प्रचंड त्रासदायक आणि असह्य होऊन बसलेले असताना,महारानीमधील प्रत्येक कलाकाराचा अभिनय प्रचंड सुखावणारा आणि गुंतवून टाकणारा ठरतो.एवढ्या प्रचंड लांबीच्या वेबसिरीजला कुठेही रटाळ होऊ न देता प्रत्येक फ्रेम खिळवून टाकणारी बनविण्यात निर्माते आणि दिग्दर्शक कमालीचे यशस्वी झालेत. 

सुरवातीला काही काळ अंगावर येणारी हुमा कुरेशी प्रत्येक फ्रेमनंतर आश्वासक वाटत जाते.तिने यामध्ये साकारलेली टिपिकल बिहारी स्त्री केवळ अप्रतिम,पण तिची इतर कलाकारां पेक्षा जास्त असलेली उंची थोडी विसंगत वाटते  आणि तिला विना मेकअप पाहणे मध्येच जड जाते.

ह्या सर्व कलाकारांमध्ये कमाल केली ती अमित सियाल याने.सत्ता स्थापनेसाठी कायमच आतुर असलेला आणि बहुमत असूनही सत्ताखेळात सतत पराभव झालेला विरोधी पक्षनेता त्याने ज्या ताकदीने साकारलाय त्याला खरोखरच तोड नाही.अमित सियालचा अभिनय बघून अनेकांना ओळखीची राजकीय पात्र आठवू शकतात हा भाग वेगळा.


पण देशभरातील राजकीय खेळात कळीचा नारद ठरत आलेल्या राज्यपालाच्या भूमिकेत अतुल तिवारी वेगळेच रंग भरतात,त्यांनी ह्या भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेय हे निश्चित.

कथेबद्दल काहीही सांगणे हा प्रेक्षकांसोबत द्रोह ठरेल,पण एवढे मात्र निश्चित राधे पाहून वैतागला असाल आणि भारतीय अभिनय कलेच्या दर्जावरचा विश्वास उडाला असेल तर महाराणी हि वेब सिरीज तुमच्या सर्व शंकांवरील उत्तर नक्कीच ठरेल....

Its a Highly recommended must watch Political Drama Thriller....

Comments