संजय सिंग खरोखरच उत्तर प्रदेशमध्ये चमत्कार घडवतील का?
अण्णा आंदोलनातून उभ्या राहिलेल्या राजकीय पक्षातील म्हणजे आम आदमी पार्टी पक्षातील ज्या काही राजकारणी मंडळींनी लक्षवेधी कामगिरी केली त्यामध्ये राज्यसभा खासदार संजय सिंग यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.दिल्लीमधील सरकारचा चेहरा प्रामुख्याने अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया या दोन नावांभोवती फिरत असला तरीही उत्तर प्रदेश सारख्या देशातील सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या तितक्याच संवेदनशील असणाऱ्या राज्यातून येणाऱ्या आणि आता राज्यसभेचे खासदार असणाऱ्या संजय सिंग यांचे प्रस्थही अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसते. बेछूट आरोप करून अमाप प्रसिद्धी मिळवायची सवय लागलेल्या राजकारणी मंडळींमध्ये अभ्यासपूर्ण आणि तितक्याच प्रभावीपणे बोलणाऱ्या मंडळींमध्ये संजय सिंग यांचा समावेश होतो. त्यांनी अलीकडच्या काळात अनेक पत्रकार परिषदा घेऊन योगी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले आणि त्यात सर्वात लक्षणीय ठरला तो त्यांनी उजेडात आणलेला राम मंदिर जमीन खरेदी घोटाळा. फक्त पाच मिनिटात जमिनीची किंमत करोडो रुपयांनी वाढली हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आणि खळबळ उडवून दिली.इंधन दरवाढीतून मोदी...



